शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४

दु:खं आहे कुठे सांगण्यासारखे ?

दु:खं आहे कुठे सांगण्यासारखे ?

घाव नाहीत हे चांदण्यासारखे ... !


तूच नाहीस ... मी काय आता करू ?

काय आहे इथे थांबण्यासारखे ?


काय होते असे लागले जे तुला ?

बोललो काय मी झोंबण्यासारखे ? 


काय होते मला वाटले वेगळे .. ?

काय आहे ' तसे ' वाटण्यासारखे ?


अर्थ अर्थात हे मिसळले एवढे...

शब्द नव्हते तिथे कोंबण्यासारखे ... 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०५.२०२३ रात्रौ २३.५५

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

मजल दर मजल...

 मजल दर मजल मजल होत गेली

अशी जीवनाची सहल होत गेली


तिने पात्र होते जरासे बदलले

नदी उंच होती, सखल होत गेली 


जरी राहिलो मी किती आड माझ्या

जगाला तरीही दखल होत गेली 


किती काळ मीही समस्याच होतो

तुला भेटलो अन् उकल होत गेली 


मला तू मिळाली, तुला मी मिळालो 

तुझी तीच माझी गझल होत गेली !



....देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०६.२०२४ सकाळ ०९.४५

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

मराठी गझल अंतरीचे बोल माझ्या ...

अंतरीचे बोल माझ्या ...


अंतरीचे बोल माझ्या ऐकले आहेस का तू ? 

कान माझ्या काळजाला लावले आहेस का तू ? 


माझिया डोळ्यांतले तू पाहिले आहेस पाणी ...

आतल्या गहिऱ्या व्यथांना पाहिले आहेस का तू ? 


माळला आहेस माझा कुंतली प्राजक्त सारा ...

माझिया हळव्या कळ्यांना माळले आहेस का तू ? 


मी तुझ्यासाठी जगाशी केवढी केली लढाई !

माझियासाठी जगाला सोडले आहेस का तू ? 


जीव मी जो लावला तो जीव होता का फुकाचा ?

सांग प्रेमाला कधी ह्या जाणले आहेस का तू ? 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील 

२५.०१.२०२४ संध्याकाळी ०६.३०

.................

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४

अंतरीचे बोल माझ्या

" अंतरीचे बोल माझ्या " हा माझा ब्लॉग मराठी गझलला वाहिलेला आहे. मराठी गझलने मला जिवंत ठेवले आहे. तिने मला खूप काही दिले आहे. मराठी गझल ही मला खुद्द गुरुवर्य सुरेश भट यांनी थेट दिली आहे. त्यांचे थेट मार्गदर्शन मला सुरूवातीलाच काही वर्षे मिळाले हे माझे भाग्य आहे ! 


" अंतरीचे बोल माझ्या "या ब्लॉगमध्ये मराठी गझलबाबतचे माझे व इतरांचेही लेख असतील. तसेच, माझ्या मराठी गझलांसह मला आवडलेल्या सुंदर सुंदर मराठी गझलांचाही अंतर्भाव असेल. 

मला खात्री आहे की माझा " अंतरीचे बोल माझ्या " हा ब्लॉग तुम्हांला निश्चितच आवडेल ! 

ज्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मला सुरूवातीलाच काही वर्षे मिळाले त्या आदरणीय गुरुवर्य #सुरेश_भट यांना समर्पित ! 

आपापल्यापरीने

आपापल्यापरीने  आपापल्यापरीने सारेच थोर होते ... आले कुठून मग हे डाकू नि चोर होते ? ज्यांची घरे गुलाबी ते झोपले कधीचे... ज्यांना न घर तयांचे ...