बोचरी जाणीव
आत माझ्या एक माझी बोचरी जाणीव होती
सारखी माझ्या चुकांना येत माझी कीव होती
ती निघाली वाकडी जी वाट होती मी निवडली
वाटली ती काल साधी , सरळ अन् आखीव होती
सर्व माझ्या काळजाचे कोपरे हे खास होते
पण कुणाची एक जागा त्यातही राखीव होती
सारखा माझ्या दिशेने प्रश्न माझा येत होता
त्यात पोकळ उत्तरांची मांडणी निर्जीव होती
एक तर माझाच खटला , मीच न्यायाधीश होतो
अन् तरी तारीख माझी सारखी वाढीव होती
मी कशाला पत्रिकेची काळजी माझ्या करावी ?
हाय, जन्माचीच माझ्या नोंदही ऐकीव होती !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
१४.०१.२०२४ रात्रौ ०७.३०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा